(गणपतीपुळे / वैभव पवार)
आजपर्यंतच्या इतिहासात जेवढी महान व्यक्तिमत्त्व ही, वाचनातून मोठी झाल्याचे आपल्या निदर्शनास येते. म्हणून लहान वयात विद्यार्थ्यांनी वाचनाच्या सवयी आत्मसात करणे आवश्यक असून, त्यातून आपला व्यक्तिमत्त्व विकास साधता येईल असे मत ग्रुप ग्रामपंचायत वाटद मिरवणेचे सरपंच अमित वाडकर यांनी व्यक्त केले. ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सलग १२ तास अभ्यासवर्गाचे शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटावर मात करत अत्त्युच शिखर गाठले, तोच आदर्श विद्यार्थ्यांनी स्वीकारला पाहिजे. त्यासाठी वाचनाची आणि अभ्यासाची आवड विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. त्याची सुरुवात शाळेत राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमाच्या माध्यमातून व्हायला मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला.
या उपक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी उपक्रमाचे स्वरुप स्पष्ट केले तर शाळेच्या उपशिक्षिका राधा नारायणकर यांनी या उपक्रमाबाबत योग्य त्या सूचना दिल्या. या उपक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित असणारे माजी सरपंच तथा शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे, विश्वनाथ शिर्क यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रमाच्या समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांनी आपापले अनुभव कथन करत उपक्रमाच्या यशस्वीतेचे वर्णन केले.
या उपक्रमात शाळेचे आजी – माजी विद्यार्थी सहभागी होत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली व इतर पुस्तकांचे वाचन करत अभिवादन केले. मागील अनेक वर्षे शाळेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना, सलग वाचन करत वैचारिक अभिवादन व्हावे यासाठी या उपक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या हेतूने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वाती धनावडे, उपाध्यक्ष मारुती कुर्टे, बालरक्षक विश्वनाथ शिर्के, मनस्वी तांबटकर, प्रिया तांबकर, अक्षरा शिर्के, समीक्षा तांबटकर, अनिल रेवाळे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती, शाळा विकास समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, सर्व पालक आणि ग्रामस्थ यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच उपक्रमाच्या सुरुवातीला आणि समारोप प्रसंगी पालक व ग्रामस्थ यांची उपस्थिती मोठी होती.
या उपक्रमाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख एकनाथ महाकाळ यांच्या निर्देशानुसार शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि उपशिक्षक राधा नारायणकर यांनी केले.

