(रत्नागिरी)
जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत २ लाख ४० हजार १०० रुपये किमतीचा ४ किलो गांजा जप्त केला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शहर आणि ग्रामीण भागात गस्त सुरू केली होती.
या गस्तीदरम्यान आठवडा बाजार परिसरातील एका अर्धवट बांधकाम केलेल्या शेडजवळ एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळला. त्याच्या पाठीवर असलेल्या सॅकची पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्यामध्ये पांढऱ्या टेपने गुंडाळलेली दोन पॅकेट आढळली. तपासात त्यामध्ये हिरवट–काळपट, उग्र वासाचा ४ किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले.
जप्त मालाची अंदाजे किंमत २,४०,१०० रुपये असून, अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव नंदादीप नामदेव वाघदरे (वय २९, रा. लांजा) असे आहे. त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ३६३/२०२५ नोंदवून एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ च्या कलम ८ (क) व २० (ब)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक बगाटे व अपर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पो.उनि. संदीप ओगले, पो.हवा. शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकट, अमित कदम, प्रविण खांबे, गणेश सावंत, सत्यजित दरेकर तसेच चा.पो.कॉ. अतुल कांबळे व दत्ता कांबळे यांचा समावेश होता. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.

