(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतून तब्बल ५० लाखांचे सोन्याचे दागिने लांबवल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. संशयित आरोपी व बँकेचा शिपाई अमोल आत्माराम मोहिते (४२, रा. टिके, रत्नागिरी) याच्या घरावर टाकलेल्या झडतीत तब्बल दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले.
१८ फेब्रुवारी २०२५ ते ४ ऑगस्ट २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत शाखाधिकारी किरण विठ्ठल बारये, कॅशियर ओंकार अरविंद कोळवणकर आणि शिपाई अमोल मोहिते या तिघांनी संगनमत करून तारण ठेवलेल्या दागिन्यांवर डल्ला मारला. तिजोरीत जमा करताना नागरिकांचे दागिने हडप करून एकूण ५०४.३४ ग्रॅम सोने परस्पर लांबवण्यात आले.
दरम्यान, या घोटाळ्याचा भांडाफोड झाल्यानंतर गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी अमोल मोहितेला अटक करून कसून चौकशी केली. त्यानंतर त्याच्या घरातून दोन तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणातील संपूर्ण मुद्देमाल हाती लागेल, अशी खात्री पोलिसांनी व्यक्त केली आहे. अपहार झालेल्या दागिन्यांचा शोध लवकरच पूर्ण होईल. नागरिकांनी निश्चिंत रहावे, असे आश्वासन शहर पोलिसांकडून देण्यात आले.

