(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील चरवेली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश गंगाराम सावंत यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत जबाबदारी सोपवली असून गावभर त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.
महावितरणमधून सेवानिवृत्तीनंतर प्रकाश सावंत यांनी आपल्या वडील श्री. जी. जी. सावंत यांचा सामाजिक कार्याचा वारसा जोपासला. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून विविध उपक्रमांचे आयोजन, शिबिरांचे मार्गदर्शन आणि ग्रामपंचायतीच्या योजनांमध्ये सहभाग या माध्यमातून त्यांनी गावच्या प्रगतीस हातभार लावला आहे. गावात शांतता व सलोखा राखण्यासाठी तसेच अंतर्गत वाद मिटवण्यासाठी सावंत यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा व परस्पर सहकार्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्याची दखल घेऊनच गावकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.
सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
गावातील सलोखा व सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी सावंत यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या निवडीमुळे ग्रामविकासाच्या वाटचालीला नवे बळ मिळेल, गावासह इतर विविध सामाजिक संघटनांतर्फे त्यांचे सत्कार व अभिनंदन केले जात असून या निवडीमुळे चरवेली गावाने तंटामुक्तीच्या चळवळीत आणखी एक भक्कम पाऊल टाकले आहे.

