( रत्नागिरी /प्रतिनिधी )
नंदाई प्रतिष्ठान हातखंबा यांच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. हातखंबा हायस्कूलचे मुख्याध्यापक धोंगडे सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आशादीप संस्थेचे संस्थापक ट्रस्टी दिलीपजी रेडकर, सहकार बोर्डाचे सदस्य नितीन कांबळे, शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष संतोष कांबळे, राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका महामाया सुर्वे, शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर मुरकुटे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
समाजोपयोगी सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या आशादीप संस्थेला “सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा पुरस्कार २०२५” जाहीर करून गौरविण्यात आले. गेली २५ वर्षे मतिमंद मुलांचे पालनपोषण, औषधोपचार आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण या क्षेत्रांत संस्थेने बजावलेल्या योगदानाची विशेष दखल यावेळी घेण्यात आली. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांना प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष म्हणून झालेल्या निवडीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. शिक्षणक्षेत्रात विद्यार्थ्यांना नि:स्वार्थी मार्गदर्शन करणारे सुधाकर मुरकुटे, सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नितीन कांबळे, तसेच हातखंबा हायस्कूलचे मुख्याध्यापक धोंगडे सर यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला. राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महामाया सुर्वे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी केले. संस्थेच्या १८ वर्षांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा त्यांनी मांडला. समाजभूषण पुरस्कार प्राप्त शिला कोबळे यांच्यासह शिक्षण व सामाजिक योगदानासाठी अरखा जाधव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुदेश कांबळे, आदेश कांबळे व सुनिल कांबळे यांचा यथोचित गौरव करण्यात आला. हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खुशी कोबळे हिच्यासह आरुषी कांबळे हिचाही सत्कार करण्यात आला. दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विचारपत्र, बाबासाहेबांची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच बारावीतील उत्पल कदम या विद्यार्थ्याचे शिक्षण संस्थेने दत्तक घेऊन शैक्षणिक साहित्य व आर्थिक सहाय्य जाहीर केले.
सुधाकर मुरकुटे यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले. पालकांच्या वतीने अरुण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सुदेश कोबळे, दिशा कांबळे, स्नेहल कांबळे, नंदीनी कांबळे यांच्यासह ग्रामस्थ व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंतराव सावंत यांनी केले.

