(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे आयोजित करण्यात आलेली शालेय स्तरावरील कै.श्रीधर कृष्णा पेटकर स्मृती एकपात्री अभिनय स्पर्धा, बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेला तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. नटराज पूजन करून आणि श्रीफळ वाढवून या स्पर्धेला सुरुवात झाली. ही स्पर्धा संपल्यानंतर त्वरित पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
या स्पर्धेत सोहम आडीवरेकर, इरा गोखले, ध्रुव बनप, प्रचिती पातये, यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय (विभागून) क्रमांक पटकावला. आर्यन चौगुले आणि राखी पवार यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. विजेत्यांना रोख रुपये १५००,१३००,११००,५००,५०० तसेच स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले ,सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आली.
सुहास पेटकर यांनी आपले वडील कै. श्रीधर कृष्णा पेटकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा प्रायोजित केली होती. त्यांच्या दातृत्वाला सलाम करून त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जी. एम. शेटये हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाची धुरा स्वीकारणारे, श्री. पांडुरंग नाईक सर यांचाही या रंगमंचावर यथोचित सत्कार करण्यात आला .
ग्रंथालयाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना संधी देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, यापुढे ही स्पर्धा मालगुंड, पावस, जाकादेवी या केंद्रावर घेण्यात येईल. आणि अंतिम फेरी बसणि मध्ये घेण्यात येईल.
श्री नाईक सर यांनी ग्रंथालयाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यवाह प्रकाश सोहनी यांनी मार्गदर्शन करून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले.
संस्थेचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास पेटकर, श्रीनिवास जोशी, प्रकाश सोहनी, प्रकाश लोगडे, जयवंत कदम, योगिनी सोहनी, प्रिया बंदरकर, राजश्री सुर्वे, श्वेता पाटील, सायली गावडे, जगदीश पाटील, प्रथमेश पवार, प्रशांत बंदरकर आणि श्रीकांत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.