(संगमेश्वर / एजाज पटेल)
धर्मवीर आंनद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद नावडी गट शिवसेना युवासेनेच्या वतीने नावडी(संगमेश्वर ) ग्रामपंचायत सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित शिबिरा मध्ये रक्तदात्यांनी स्वंयस्फुर्तपणे पुढे येत रक्तदान करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र, भेटवस्तु आणि रोपटे मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
“दानात दान, महादान म्हणजे रक्तदानाचे कार्य होय” आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. ज्यांचा अपघात, शस्त्रक्रिया किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे रक्ताची नितांत गरज असते अशा लोकांना रक्तदान खूप महत्वाचे ठरते. रक्तदानातून शरीरातील लोह कमी होते आणि शरीराला नवीन रक्तपेशी तयार करण्यास प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्याला फायदा होतो.
जगभरात दर दोन सेकंदाला एका व्यक्तीला रक्ताची गरज असते, त्यामुळे स्वयंसेवी रक्तदात्यांकडून नियमितपणे रक्त गोळा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण आणि रक्ताची कमतरता असलेले लोक यांच्यासाठी रक्त आवश्यक असते.गरोदरपणात आई आणि बाळाचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदानाची गरज असते. म्हणूनच रक्तदाना पेक्षा दुसरे दान नाही. हीच सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना युवा सेनेच्यावतीने नावडी (संगमेश्वर )ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात भव्य रक्तदान शबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याला तसेच बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. या शिबिरात नागरिकांसह शिवसैनिकांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, भेट वस्तू तसेच छोटेसे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. तालुक्यातील मान्यवर मंडळी, सामाजिक, राजकीय विविध संस्थाच्या मंडळींनी या शिबिराला भेट देऊन कौतुक केले.
सामाजिक कार्यामुळे मिळणारे समाधान हे एक मोठे भावनिक बक्षीस आहे. रक्तदान हा समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक जबाबदार आणि महत्त्वाचा संदेश आहे, ज्यामुळे जीवन वाचवता येते आणि समाजाच्या आरोग्यात सुधारणा मदत होत असल्याचे प्रतिपादन शिबिराचे आयोजक उप तालुका प्रमुख सुधीर चाळके यांनी केले.शिबीर यशस्वी करण्यासाठी उप तालुका प्रमुख सुधीर चाळके,विभाग प्रमुख प्रथमेश साळवी, उप विभाग प्रमुख ओंकार चव्हाण, वांद्री युवा शाखाप्रमुख विराज सालीम,सुनील जोशी यांनी परिश्रम घेतले. तर वालवालकर हॉस्पिटल डेरवण यांनी रक्तसंकलन करण्यासाठी सहकार्य केले.

