(देवरुख)
मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवामध्ये प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव (देवरुख ) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.
नुकत्याच भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी येथे पार पडलेल्या साउथ झोन युवा महोत्सवामध्ये सोळा महाविद्यालये सहभागी झाली होती. नाट्य, नृत्य, संगीत, वाड;मय, ललित कला इत्यादी सांस्कृतिक स्पर्धांमध्ये जवळपास ६०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यामध्ये या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग, क्ले मॉडेलिंग आणि कार्टूनिंग प्रकारामध्ये यश मिळविले. अंतिम वर्ष कॉम्प्यूटर विभागातील विद्यार्थी सुबोध मुनीश्वर याने दोन प्रकारामध्ये यश प्राप्त केले. त्याला पोस्टर मेकिंग प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळाला असून कार्टूनिंग प्रकारामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्यूटर सायन्स विभागातील विद्यार्थी अमित गवंडी याने क्ले मॉडेलिंग स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले असून त्यांची पुढील अंतिम फिरीसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. गणेश जागुष्टे यांचे मार्गदर्शन लाभले. या महाविद्यालयाच्या एकूण तेवीस विद्यार्थ्यानी या युवा स्पर्धा महोत्सवामध्ये भाग घेतला होता.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री श्री. रवींद्र माने, उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले व त्यांना पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

