( रत्नागिरी /प्रतिनिधी )
ग्रामीण भागातून शहराकडे बेकायदेशीर चिरा वाहतूक पुन्हा उघडपणे सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसी भागातून कोकणनगर मार्गे दररोज नव्हे तर दिवसा देखील मोठ्या प्रमाणात जांभ्या चिऱ्याचे फुल्ल भरलेले ट्रक शहराकडे धडधडत येताना दिसत आहेत. ही वाहतूक गुप्तपद्धतीने करण्याचा दिखावा असला तरी प्रत्यक्षात ती सर्वांच्या नजरेसमोर सुरू आहे.
चिरा उत्खनन व वाहतुकीसाठी कोणतीही परवानगी नसतानाही हा प्रकार सुरू आहे. जिल्हा खणीकर्म विभागाकडे या हालचालींवर अद्याप कोणतीही मोठी कारवाई झालेली नाही. त्यामुळे अधिकारी झोपले आहेत की मुद्दाम डोळेझाक करत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चिरेखाण व्यवसायिकांना महसूल विभागाने वाहतुकीचे पास दिलेले नसताना सुद्धा ऐन पावसाळ्यात एका मागोमाग एक ट्रक धावत असल्याचे पहायला मिळत आहेत. खुलेआम व मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना ती थांबवणे प्रशासनासाठी अशक्य नाही, पण इच्छाशक्ती मात्र दिसत नाही. त्यामुळे वाहतूक कशी काय केली जात आहे, कोणाच्या आशीर्वादाने ही बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे? या मागचे नेमके गौडबंगाल काय आहे? हे प्रश्न अधिक तीव्र होत आहे.
कायदा फक्त कागदावर?
खनिज नियमावलीनुसार परवानगीशिवाय चिरा काढणे आणि वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. तरीदेखील, मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार प्रशासनासाठी ‘सामान्य’ झाला आहे. गुप्तपणे सुरू असलेल्या वाहनांना काही अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याची चर्चा आहे. या बेकायदेशीर वाहतुकीमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होत आहे. मातीचे क्षरण, पर्यावरणीय समतोल बिघडणे आणि भूगर्भीय रचना धोक्यात येणे, अशा गंभीर परिणामांची शक्यता आहे.
कुंपणच शेत खातं का?
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा खणीकर्म विभाग’ हा स्वतंत्र विभाग बेकायदेशीर उत्खनन रोखण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. नियमांचे पालन, परवानगीची तपासणी, आणि बेकायदेशीर उत्खननावर कारवाई ही या विभागाची मुख्य जबाबदारी आहे. मात्र सध्या हा विभाग आपली भूमिका पार पाडण्याऐवजी बघ्याच्या भूमिकेत आहे. कुंपणच शेत खातं का? हा सवाल उपस्थित होत असून चर्चेचा विषयही बनला आहे. कारण ज्या जिल्हा खणीकर्म विभागावर बेकायदेशीर उत्खनन रोखण्याची जबाबदारी आहे, तोच विभाग डोळेझाक करून या कारभाराला छुपा आशीर्वाद देत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

