(रायगड)
मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनाऱ्यावर पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या तनिष्क मल्होत्रा (वय २०) या तरुणाचा मृतदेह ४३ तासांच्या शोधानंतर सापडला आहे. तनिष्क आणि त्याचे मित्र मार्क मिल्टन, वरुण तिवारी आणि पुण्य पाटील हे चौघेही पुणे येथील पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी होते. ते एकदिवसीय सहलीसाठी काशीद येथे आले होते. समुद्रस्नान करताना तनिष्क अचानक खोल पाण्यात गेला आणि समुद्राच्या लाटा त्याला ओढून नेत असल्याचे मित्रांनी पाहिले. त्यानंतर तात्काळ शोध मोहिम सुरू करण्यात आली.
या शोधमोहीमेत तटरक्षक दल, लाईफ गार्ड्स, स्थानिक नागरिक, SVRSS रेस्क्यू टीम आणि मुरुड पोलिस सहभागी होते. शोधकार्य हेलिकॉप्टर आणि थर्मल ड्रोनच्या सहाय्याने ३ जुलै रोजी सकाळी सात वाजता सुरू करण्यात आले. केवळ ४५ मिनिटांतच, सकाळी ७:४५ वाजता तनिष्कचा मृतदेह सापडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदनासाठी त्याला मुरुड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
समुद्रकिनाऱ्यावर धोका कायम
सध्या पावसाळी हवामानामुळे समुद्रकिनारे अधिकच धोकादायक झाले असून प्रशासनाने समुद्रात उतरण्यास बंदी घातलेली आहे. तरीदेखील अनेक पर्यटक ही सूचना धाब्यावर बसवून पाण्यात उतरतात, त्यामुळे अशा दुर्दैवी घटनांचा धोका अधिकच वाढतो आहे. मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक विजय देशमुख यांनी पावसाळ्यात समुद्रात उतरणे टाळावे, असा स्पष्ट इशारा दिला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे एका स्पीड बोटीची मागणी करण्यात आली आहे, जी आपत्कालीन प्रसंगी त्वरित मदतीसाठी तैनात केली जाईल. काशीद व मुरुड परिसरात मागील काही वर्षांत अंदाजे १५० पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. मात्र, योग्य वेळी दिलेल्या स्थानिक प्रशासन व बचाव पथकाच्या मदतीमुळे अनेकांचे प्राणही वाचवण्यात यश आले आहे.