(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व व्हिडिओ असोसिएशनच्या वतीने यंदा गुहागर येथे भव्य फोटो फेअर व जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विविध तालुक्यांतील असंख्य फोटोग्राफर उपस्थित राहिल्याने हा मेळावा उत्साहात आणि दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रकला उद्योग समूह आबलोलीचे अध्यक्ष सचिनशेठ बाईत यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहिल आरेकर व पत्रकार संघ, गुहागरचे अध्यक्ष मनोज बावधनकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून फोटो फेअरचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलन व कॅमेरा पूजन करून छायाचित्रकार क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, कार्याध्यक्ष गुरु चौगुले, सचिव प्रवीण पाटोळे, खजिनदार सुरेंद्र गीते, तालुकाध्यक्ष समीर बावधनकर तसेच प्रसिद्ध प्रशिक्षक प्रमोद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा तसेच तालुका प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. संघटनेच्या वतीने आजवर राबविण्यात आलेल्या शेकडो कार्यशाळा, वेबिनार, आरोग्य शिबिरे व फोटोग्राफरच्या अडचणींमध्ये केलेली मदत या कार्याचा उल्लेख करून मान्यवरांनी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. अल्पावधीतच रत्नागिरी जिल्हा संघटनेने महाराष्ट्रातील सर्वोत्तम फोटोग्राफर असोसिएशन म्हणून लौकिक मिळविल्याचा अभिमान सर्वांनी व्यक्त केला.
दुपारच्या सत्रात प्रशिक्षक प्रमोद गायकवाड यांनी वेडिंग फोटोग्राफी या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष मॉडेलसह कमी साधनसंपत्ती व प्रकाशात लग्नछायाचित्रण कसे करावे याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. केक कापून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या मेळाव्यात राज्यातील नामांकित फोटोग्राफी कंपन्यांनी आपल्या उत्पादनांची प्रदर्शन-विक्री केली. जिल्ह्यातील बहुसंख्य फोटोग्राफर व सर्व तालुका असोसिएशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

