(चिपळूण)
शहरानजीकच्या खेर्डी येथील सोनक टोयोटा कंपनीच्या शोरूमधील तत्कालीन सेल्स ऑफिसरने तब्बल १२ लाख ६१ हजार ४८१ रुपयांचा अपहार केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी गणेश बळीराम कराडकर याच्यावर शनिवारी अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रविकुमार विजय जाधव (४१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश बळीराम कराडकर हे १२ डिसेंबर २०२४ ते १७ फेब्रुवारी २०२५ या मुदतीत खेर्डी येथील सोनक टोयोटा कंपनीच्या शोरूममध्ये सेल्स ऑफिसर म्हणून कामाला होते. या कालावधीत कंपनीचे ग्राहक शाम पांडुरंग बहुतले व दुसरे ग्राहक अबरार अकबर कौचाली यांच्याकडून त्यांनी अनुक्रमे ७ लाख ३० हजार रुपये व ५ लाख ३१ हजार ४८१ रुपये असे एकूण १२ लाख ६१ हजार ४८१ रुपये रोख व गुगल पेद्वारे स्वतःच्या बँक खात्यात जमा केले होते. मात्र, हे पैसे कंपनीच्या बँक खात्यात किंवा कॅशिअरकडे जमा न करता ती रक्कम परस्पर स्वतःच्या फायद्याकरिता वापरल्याचे निष्पन्न झाले आहे.
या अपहारप्रकरणी गणेश कराडकर याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६ (४), ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

