(चिपळूण)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यामध्ये श्री. प्रवीण भालचंद्र पवार यांची २४ नोव्हेंबर १९८६ मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेची सुरुवात झाली. दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सारंग ब्राह्मणवाडी शाळेत प्रथम सेवेचा प्रारंभ केला. कालांतराने विनंती बदलीने चिपळूण तालुक्यातील खेर्डी नंबर १ या मोठ्या शाळेत कार्यरत झाले. चिपळूण तालुक्यातील नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या पोफळी होडेवाडी, अलोरे कॉलनी या शाळेमध्ये सक्षमपणे काम केले. अलोरे कॉलनी येथे विद्यार्थी पटसंख्या ६२५ व शिक्षक संख्या २४ असताना एक तरुण पदवीधर शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. यावेळी त्यांनी इंग्रजी बाह्य परीक्षेला अनेक विद्यार्थ्यांना बसवून चांगले प्राविण्य मिळवून दिले होते.
याच दरम्यान त्यांना झालेल्या अपघातामुळे त्यांनी पदवीधर वेतनश्रेणी नाकारुन कोळकेवाडी धनगरवाडी सारख्या अतिशय दुर्गम भागात साडेचार वर्ष काम केले. अनारी या शाळेमध्ये सुद्धा अनेक वर्ष अध्यापन करण्याची संधी त्यांना लाभली. आत्तापर्यंत शिक्षण क्षेत्रात ३८ वर्ष प्रदीर्घ अशी प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठेने सेवा करत असताना कादवड नं.२ या शाळेतून शिक्षण विस्तार अधिकारी पदावर जिल्हा परिषदेने पदोन्नती दिली. त्यांना संगमेश्वर तालुक्यातील कडवई प्रभागामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली आहे.
प्रवीण पवार यांचे ज्येष्ठ बंधू प्रदीप पवार हे उत्तम शिक्षक म्हणून व पुरोगामी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांचे संघटनात्मक कार्य अजूनही सुरू असून अशा ज्येष्ठ बंधूच्या मार्गदर्शनाखाली व आई वडिलांचे आशीर्वादाने शैक्षणिक कामकाज उत्तमरित्या व जबाबदारी पूर्वक करू असा विश्वास श्री. प्रवीण पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे सर्व पवार कुटुंबीय , शिक्षक मित्रपरिवार, सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी, केंद्रीय प्रमुख संघटना, ग्रामस्थ व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन केले आहे.