(पुणे)
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हुंडाबळीची दुर्दैवी घटना घडली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा अजूनही ताजी असतानाच आणखी एका उच्चशिक्षित तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून मृत्यूला कवटाळल्याची घटना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील W-57 सोसायटीमधील घरी तिचा राहत्या घरात गळफास लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
मृत तरुणीचे नाव दिव्या हर्षल सूर्यवंशी (वय 26) असे असून, विशेष म्हणजे तिचा पती आयटी अभियंता आहे. वाकड येथील W-57 या उच्चभ्रू सोसायटीत सोमवारी संध्याकाळी दिव्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. तथापि, ही आत्महत्या नसून खून असल्याचा गंभीर आरोप दिव्याच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
सोनं व पैशांसाठी छळ
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्याच्या पतीने व सासरच्यांनी वारंवार सोन्याच्या दागिन्यांसाठी तसेच घरातील फर्निचर बनवण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, असा तगादा लावला होता. या कारणास्तव दिव्याचा सतत मानसिक छळ करण्यात आल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
दिव्या मूळची धुळे जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील होती. उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर सुमारे तीन वर्षांपूर्वी तिचा विवाह हर्षल शांताराम सूर्यवंशी या आयटी अभियंत्यासोबत झाला होता. मात्र विवाहानंतरच्या काळात तिच्यावर सासरकडून विविध मागण्यांचा दबाव आणण्यात येत होता.
कायदेशीर कारवाईची मागणी
या प्रकरणी दिव्याच्या नातेवाईकांनी हर्षल सूर्यवंशी व त्याच्या कुटुंबीयांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिव्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

