(पुणे)
पुणे शहरात बनावट सोने तारण ठेवून सराफांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने केला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. खांदवेनगर आणि वाघोली परिसरात संशयास्पद हालचाल करत असलेल्या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तपासात गेल्या सहा महिन्यांपासून आरोपींनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक सराफांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी बनावट हॉलमार्क आणि सोन्याचा मुलामा असलेले दागिने गहाण ठेवून सराफांकडून लाखो रुपये उकळले होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रोहित संजय गोरे (३०, रा. मोहननगर, धनकवडी), अजय दत्तात्रय पवार (२८, रा. वडगाव बुद्रुक) आणि ओम सुंदर खरात (२३, रा. वडगाव बुद्रुक) अशी आहेत. यापैकी रोहित गोरे याचे स्वतःचे कपड्यांचे दुकान आहे, तर अजय आणि ओम हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्यांनी फसवणुकीचा मार्ग निवडला. कल्याण येथे राहणाऱ्या दोन व्यक्तींकडून ते एक तोळा बनावट दागिना, हॉलमार्क आणि पावतीसह केवळ ३० हजार रुपयांना खरेदी करत. याच दागिन्यांचा वापर करून ते विविध सराफांकडे ते तारण ठेवत आणि प्रत्येकी ६० हजार रुपये उचलत. रोहित गोरे हा मुख्य सूत्रधार असून, तो उर्वरित दोघांना प्रत्येकी ५ हजार रुपये देत असे.
फसवणूक करताना ते बनावट आधारकार्डही वापरत होते, त्यामुळे सराफांना त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. एक सराफ दागिन्याची शहानिशा करत असताना तो बनावट असल्याचे लक्षात आले. त्याने आरोपींना विचारले असता त्यांनी अनभिज्ञतेचे सोंग घेतले. यानंतर सराफाने पोलिसांना माहिती दिली आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ३ लाख रुपये रोख, १ लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन्स आणि ४ लाख रुपये किमतीचे बनावट हॉलमार्क असलेले दागिने यांचा समावेश आहे.
या आरोपींविरोधात चंदननगर, काळेपडळ, पर्वती आणि आंबेगाव पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून, पुढील तपासासाठी त्यांना चंदननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विशेष म्हणजे फसवणुकीचा प्रकार उघड होण्याआधी त्यांनी काही सराफांना पैसे परत करून तक्रार न करता प्रकरण ‘सेटल’ करण्याचाही प्रयत्न केला होता.
बनावट हॉलमार्क आणि ट्रेडमार्कचे दागिने पुरवणाऱ्या कल्याण येथील दोघांनाही आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी या टोळीचा विस्तृत तपास सुरू केला असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, तसेच पोलीस अंमलदार नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, नेहा तापकीर, प्रतिक्षा पानसरे यांचा समावेश होता. त्यांच्या समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी झाली.
सध्या पुण्यात सराफ व्यवसायिकांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सर्व सराफ दुकानदारांना अशा फसवणूक टाळण्यासाठी दागिन्यांची योग्य तपासणी करूनच व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी आणि गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.

