( मुंबई )
या वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यंदाच्या महोत्सवासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, व्याख्याने, लोककलेचे सादरीकरण आणि रोषणाईच्या सजावटींसह अनेक उपक्रम या महोत्सवात राबवले जाणार आहेत.
गणेशोत्सवाचे जागतिकीकरण आणि परंपरेचे जतन
सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी यंदा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. या निर्णयामागील उद्देश स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा मानबिंदू आहे. या उत्सवाची ओळख संपूर्ण जगभर व्हावी, परंपरेला आधुनिकतेशी जोडून समाजसुधारणेचे, सांस्कृतिक जतनाचे आणि पर्यटनवृद्धीचे माध्यम म्हणून गणेशोत्सवाचे व्यासपीठ अधिक सक्षम व्हावे, यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.” या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शासनातर्फे चार स्वतंत्र निर्णय (GRs) देखील निर्गमित करण्यात आले आहेत.
‘राज्य महोत्सवा’त राष्ट्रीय विषयांचीही सांगड
गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप देताना, यंदा ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘स्वयंपूर्ण भारत’ या राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमांनाही महोत्सवाशी जोडण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारत, स्वदेशीचा जागर, आणि भारतीय सैन्याची शौर्यगाथा या विषयांचा समावेश करून, उत्सवाला सामाजिक आणि राष्ट्रीय चेतनेचे परिमाण देण्यात आले आहे. भारतीय सैन्य दलाने फत्ते केलेले ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ आणि स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी ‘स्वदेशीचा जागर’ हे दोन विषयही या निमित्ताने राज्यमहोत्सवाशी जोडण्यात येत आहेत. अध्यात्म, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक असणारा सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षीपासून राज्यमहोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
बोधचिन्हाचा सर्वत्र वापर अनिवार्य
या वर्षीपासून सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नवीन अधिकृत बोधचिन्हाचा वापर करणे अनिवार्य असेल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेल्या या बोधचिन्हाचे राज्यभर प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड. शेलार यांनी दिली.

