( मुंबई )
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने e-KYC प्रक्रियेला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी e-KYC करण्याची अंतिम मुदत उद्या 18 नोव्हेंबरपर्यंत होती. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून या निर्णयाची माहिती दिली.
राज्यातील काही भागांत अलीकडेच पूरस्थिती आणि विविध अडचणींचा सामना करावा लागल्याने अनेक महिलांना वेळेत e-KYC प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती. या परिस्थितीची दखल घेत सरकारने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री तटकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात ‘माझी लाडकी बहीण’ योजना राज्यभर यशस्वीपणे राबवली जात आहे. मात्र, नैसर्गिक आपत्ती आणि अनपेक्षित अडचणींमुळे अनेक पात्र महिलांना प्रक्रिया पूर्ण करता आली नाही, म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
पती/वडील हयात नसलेल्या महिलांसाठी विशेष सूचना
ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, किंवा घटस्फोट झालेला आहे, त्यांनी स्वतःचे e-KYC पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांच्या सत्यप्रत जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे.
मुदतवाढीमुळे योजनेचा लाभ कोणत्याही व्यत्ययाशिवाय मिळत राहील, असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच ज्यांनी अद्याप e-KYC पूर्ण केलेले नाही, त्यांनी नव्या अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

