( राजापूर / तुषार पाचलकर )
पाचल व परिसरातील श्री राम सेवक मंडळ-पाचल पंचक्रोशी या मंडळाने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात आणि आनंदात साजरा केला. या आनंदसोहळ्यात अनुस्कुरा- ओणी मार्गांवरील पाचल जवळेथर फाटा या पंचक्रोशीतील चौकला छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नामांतर करून शिवप्रेमींना सुखद धक्का दिला..
दुर्गा दौड, महाराज्यांच्या प्रतिमेची पूजा व अभिषेक करून आजिवली-नेरले- हातदे -जवळेथर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक – पाचल अशी बहुजनांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढण्यात आली. यानंतर प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत महाराजांचा जयजयकार – जयघोष आणि ढोल – ताश्याचा गजर करीत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या पायी रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा व हळदी कुंकू कार्यक्रमला देखील शाळेतील विद्यार्थी व महिला वर्ग याचा मिळालेला प्रतिसाद हा वाखाणण्याजोगा होता.
श्री राम सेवक मंडळ, पाचल पंचक्रोशी आयोजित १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतं असताना तरुणांचे प्रेरणास्थान असलेल्या अपूर्वाताई सामंत यांनी या जन्मोत्सवाला आवर्जून भेट देऊन तरुणांचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी मंडळाच्या वतीने समीर खानविलकर यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.याप्रसंगी जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, तालुका संघटक भरत लाड, पाचल- ओणी जि.प. गट प्रमुख आत्माराम सुतार विभागप्रमुख शैलेश साळवी अमर जाधव युवासेनेचे जगदीश (सोनू) पाथरे मंडळाचे कार्यकर्ते बंधू कुडतडकर आदींसह सर्व शिवप्रेमी उपस्थित होते.