(सातारा / वृत्तसंस्था)
कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील डुबल नगर परिसरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. रोहिणी दत्तात्रय जांभळे (वय ३९) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दत्तात्रय नारायण जांभळे (वय ४२) याला कराड शहर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये दत्तात्रय आणि रोहिणी जांभळे हे दाम्पत्य राहत होते. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कौटुंबिक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी त्यांची दोन्ही मुलं घराबाहेर खेळत होती. काही वेळाने दत्तात्रय जांभळे घाईघाईने घराबाहेर येताना मुलांना दिसले. त्यांच्या पायाला रक्त लागल्याचे मुलांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने मुलांनी घरात जाऊन पाहिले असता रोहिणी जांभळे या स्वयंपाकघरात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या दिसल्या.
चाकूच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू
दत्तात्रय यांनी केलेल्या चाकूच्या हल्ल्यात रोहिणी यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रोहिणी यांचे भाऊ राहुल वास्के यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कराडचे डीवायएसपी राजश्री पाटील आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता हॉलमध्ये रक्ताचे डाग तसेच स्वयंपाकघरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे आढळले.
रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले
पोलिसांनी तातडीने रोहिणी जांभळे यांना रुग्णवाहिकेतून कराड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेच्या वेळी घरात आई-वडिलांचा वाद सुरू असल्याचे आणि त्यानंतर वडील रक्त लागलेल्या पायाने घराबाहेर जाताना दिसल्याचे मुलांनी पोलिसांना सांगितले. मृत महिलेचे भाऊ राहुल वास्के यांनी दिलेल्या तक्रारीत दाम्पत्यामध्ये वारंवार कौटुंबिक वाद होत असल्याचे नमूद केले आहे.
घटनास्थळावरून चाकू जप्त
घटनास्थळावर आढळून आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. या हत्येमागे कौटुंबिक वादाव्यतिरिक्त आणखी काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपी दत्तात्रय जांभळे याला पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीला कराड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील करत आहेत.

