(मुंबई)
गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय स्क्वेअर या २३ मजली इमारतीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने गुरुवारी खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. मृत मुलगी इयत्ता ११वीत एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिचे वडील हे प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आहेत.
गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. त्यावेळी तरुणी आपल्या खोलीत अभ्यास करत बसली होती. घरात तिची आई व आजी-आजोबा होते, तर वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी अचानक तिने खिडकीतून उडी मारली आणि जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून ती नैराश्यग्रस्त होती आणि तिच्यावर अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे, एका महिन्याच्या आत ओबेरॉय स्क्वेअर कॉम्प्लेक्समध्ये आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एका विद्यार्थ्याने ए विंगवरून उडी मारून जीवन संपवलं होतं.
या प्रकरणी आरे कॉलनी पोलिस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

