(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेऊन निवेदन साद केले.
रत्नागिरी जिल्ह्यात, विशेषतः शहरी भागातील तरुणाई अंमली पदार्थांच्या व्यसनाकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचा मुद्दा मनसेने निवेदनातून पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. कोकेन, अफू, चरस, गांजा आदी अंमली पदार्थांची सहज उपलब्धता ही चिंतेची बाब असून, देशाचे भवितव्य असलेल्या युवा पिढीचे आयुष्य त्यामुळे धोक्यात येत असल्याचे मनसेने म्हटले आहे.
रत्नागिरी शहरात महाविद्यालये, शाळा तसेच निर्जन ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या हस्तकांचा वावर असल्याचा दावा मनसेने केला आहे. अशा संवेदनशील ठिकाणी पोलिस प्रशासनाने विशेष पथके तैनात करून नियमित गस्त आणि तपासणी वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
Gen-Z तरुणाईसह युवक मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या विळख्यात अडकत असल्याचे मनसेने म्हटले आहे. व्यसनाधीन झालेल्या काही व्यक्ती पुढे अंमली पदार्थांच्या विक्रीच्या साखळीचा भाग बनतात आणि त्यातून गंभीर गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ व्यसनाधीन तरुण किंवा किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, तर अंमली पदार्थांच्या पुरवठ्यामागील मुख्य सूत्रधार आणि मोठ्या तस्करांपर्यंत तपास पोहोचवून त्यांच्या जाळ्याचा पर्दाफाश करणे आवश्यक असल्याचे मनसेने स्पष्ट केले.
अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या माफिया आणि त्यांच्या नेटवर्कवर कठोर कारवाई करून त्यांना गजाआड करण्याची मोहीम जिल्हा पोलिस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात तातडीने हाती घ्यावी, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली. या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षाही मनसेने व्यक्त केली.
दरम्यान, अंमली पदार्थांविरोधातील जनजागृतीसाठी पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या लढ्यात पोलिस प्रशासनाला मनसेकडून संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना निवेदन देताना मनसे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष चैतन्य शेंडे, सर्वेश जाधव, तेजस नागवेकर, मार्विक नारकर, मनोज इंदुलकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

