(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी यांचे वतीने महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमात दीक्षाभूमी बुद्ध विहारात सकाळ सत्रात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण व धार्मिक पूजापाठ त्यानंतर सायंकाळच्या सत्रात दीक्षाभूमी बुद्धविहार ते खंडाळा मुख्य बाजारपेठेतून भव्य दिव्य स्वरूपाची धम्म रॅली काढण्यात आली.
या धम्म रॅलीमध्ये बावीस खेडी बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष भाई जाधव, सभापती रजत पवार, चिटणीस कुलदीप जाधव, उपचिटणीस प्रशांत मोहिते आदींसह अन्य प्रमुख पदाधिकारी व बावीस खेडी बौद्धजन महिला मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. बावीस खेडी बौद्धजन सेवा संघाच्या कार्यक्षेत्रातील तरुणांनी एकत्रित येऊन वाटद पश्चिम बौद्धवाडी येथील तरुण तडफदार धडाडीचे कार्यकर्ते राजा जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य दिव्य स्वरूपाची धम्म रॅली मोठ्या जल्लोषात व उत्साहात वाजत गाजत बेंजो पथकाच्या च्या लयबद्ध तालावर फटाक्यांच्या आतषबाजीत व बाबासाहेबांचा जयघोष करून काढण्यात आल्याने ही धम्म रॅली विशेष लक्षवेधी ठरली. या धम्म रॅलीमध्ये बाबासाहेबांच्या जीवनातील प्रासंगिक चित्ररथ तयार करून उपस्थित आमचे लक्ष वेधून घेण्यात आले. तसेच या धम्म रॅलीमध्ये वाटद खंडाळा परिसरातील तरुणांनी एकत्रित येऊन बेंजोच्या तालावर विविध भीमगीतांचे लयबद्ध वादन करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी या धम्म रॅलीत बावीस खेडी बौद्धजन सेवा संघाच्या गाव शाखांमधील धम्म बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर या जयंती कार्यक्रमाच्या रात्रीच्या सत्रात जाहीर सभेचे आयोजन बावीस खेडी बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष भाई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या जाहीर सभेमध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष भाई जाधव व सभापती रजत पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर जाहीर सभेमध्ये प्रमुख वक्त्या प्राध्यापिका रसिका सावंत व पत्रकार तथा बौद्धाचार्य वैभव पवार यांनी उपस्थित धम्म बांधवांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.
या सभेमध्ये रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष प्रकाश पवार, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, मुंबई बावीस खेडी बौद्धजन संघटनेचे अध्यक्ष दिलीप सावंत आदींनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी विचार मंचावर अध्यक्ष भाई जाधव, सभापती रजत पवार, चिटणीस कुलदीप जाधव, आर.डी. सावंत, दिनेश कदम,प्रशांत मोहिते,भालचंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या जाहीर सभेमध्ये बावीस खेडी बौद्धजन सेवा संघाच्या कार्यक्षेत्रातील तरुणांनी तरुणांनी 134 जयंती निमित्त भव्य दिव्य स्वरूपाच्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व रोख रकमेची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर बावीस खेडी बौद्धजन संघटनेला विशेष सहकार्य करणाऱ्या प्रमुख व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. करमणुकीच्या कार्यक्रमात ‘दीप तुझ्या वंशाचा’ हा तीन अंकी नाट्यप्रयोग दीक्षाभूमी कलामंच वाटद खंडाळा यांचेवतीने करण्यात आला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात रसिकांच उपस्थिती लाभली होती. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बावीस खेडी बौद्धजन सेवा संघाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला मंडळ व सदस्यांनी मेहनत घेतली.