(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात वापरल्या जाणाऱ्या म्हात्रे कंपनीच्या डंपर वाहनांवर संगमेश्वर पोलिसांनी गुरुवारी कडक कारवाई केली. या कारवाईत एकूण आठ डंपरवर वाहतूक नियमांचे उल्लंघन, ओव्हरलोड वाहतूक, आणि वाहनांवर नंबर प्लेटचा अभाव या कारणांवरून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आरवली ते बावनदी या अपघात प्रवण पट्ट्यात चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र कामाच्या दरम्यान डंपर चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः सर्विस रोड तयार न केल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून, बेजबाबदारपणे चालवले जाणारे हे डंपर अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.
पोलीस उपअधीक्षक शिवकुमार पारवे यांच्या निरीक्षणात ही परिस्थिती आल्यानंतर, त्यांनी तातडीने संगमेश्वर पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. गुरुवारी ही कारवाई राबवली गेली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये समाधानाची भावना आहे. अपघातांचा धोका कमी व्हावा, वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अशा प्रकारच्या नियमित आणि कठोर कारवाई गरजेची असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.