(नाशिक)
गुरू-शिष्य या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. येथील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याने चार विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला असून, भद्रकाली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत संशयित प्राचार्याला अटक केली आहे. प्रवीण रमेश घोलप असे अटक करण्यात आलेल्या प्राचार्याचे नाव असून, त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात POSCO (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) व संबंधित भारतीय दंडविधान कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील
ही घटना नाशिकमधील द्वारका सर्कल परिसरातील एका खासगी नर्सिंग कॉलेजमध्ये घडली. पीडित विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२४ ते २९ मे २०२५ या कालावधीत प्राचार्य प्रवीण घोलप यांनी वारंवार अश्लील वर्तन केले. तक्रारीनुसार, त्यांनी विद्यार्थिनीच्या खांद्यावर, छातीवर आणि पाठीवर हात फिरवला, तिचा हात हातात घेत अश्लील स्पर्श केला तसेच तिच्या साडीला हात लावून अश्लील नजरेने पाहत विनयभंग केला. इतकंच नाही तर, शारीरिक संबंधांची मागणी करत मानसिक त्रास दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
इतर विद्यार्थिनींसोबतही अश्लील प्रकार
प्राचार्याच्या वर्तणुकीमुळे पीडित मुलगी अतिशय घाबरली होती. काही काळानंतर तिला आपल्या इतर मैत्रिणींनाही अशाच प्रकाराचा त्रास झाल्याची माहिती मिळाली. घोलप याच्या केबिनमध्ये तसेच कॉलेजच्या आवारात पीडित मुलींना वेगवेगळे गाठून शरीरसुखाची मागणी करीत तो जबरदस्ती शरीराला स्पर्श करीत होता. त्यामुळे पीडिता भयभीत झाल्या होत्या. त्यापैकी काही पीडिता घरी गेल्यानंतरही प्राचार्य घोलप याने त्रास दिल्याचे समजते. त्यामुळे पीडितेने ही आपबिती मैत्रिणींना सांगितल्यानंतर त्यांनाही प्राचार्याने त्रास दिल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित मुलीने धैर्य एकवटून भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले व संशयित प्राचार्याला अटक केली. सद्यस्थितीत पोलीस विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींनी सुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्याची अपेक्षा असते. मात्र अशा घटना समाजाच्या मनाला हादरवणाऱ्या ठरतात. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांकडून या गंभीर प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून, आरोपीवर कठोर कारवाई केली जाणार आहे.