(संगमेश्वर / एजाज पटेल)
बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन, मात्र, सदैव ‘ऑन ड्युटी’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरे करता येत नाहीत. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून नवनिर्मिती आंबेड, नवनिर्माण महाविद्यालय, दादा साहेब सरफरे बुरंबी,जिल्हा परिषद मराठी शाळा नावडीच्या स्कूलच्या विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष संगमेश्व पोलीस ठाण्यात जाऊन शनिवारी (ता.7) पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, पोलीस उप निरीक्षक निरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस हे. कॉ. सासवे, पोलीस हे कॉ. विनय मनवल आणि इतर कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला. या वेळी पोलीस दादांनी सुद्धा ओवाळणी म्हणून लाडक्या बहिणींच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.
पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे अशक्य
आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे शक्य होत नाही. अनेक सणवार त्यांना कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक पोलीस गावाकडे असलेल्या बहिणीला भेटून सण साजरा करू शकत नसल्याने शाळा -महाविद्यालयीन विध्यार्थिनींनी रक्षाबंधन हा सण पोलिस दादा सोबत साजरा केला.
विद्यार्थिनींनी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. रस्त्यावर भर पावसात कर्तव्य बजावण्यासाठी उभ्या असणाऱ्या व वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी धावपलीत असलेल्या वाहतूक पोलिसांना देखील राखी बांधून ओवाळले. चिमुकल्या विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मुलींच्या आदरामुळे भारावले होते. पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी सर्व विद्यार्थिनीं आणि शाळेच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
पोलिसांनी शस्त्र हाताळण्याची माहिती दिली
राखी बंधन या कार्यक्रमाचे औचित्य साधत पोलीस ठाण्यात पोलिसांना राखी बांधण्यासाठी आलेल्या विध्यार्थिनींना पोलीस वापरत असलेल्या शस्त्रास्त्रांची ओळख करून देताना शस्त्रास्त्रांचा सुरक्षित वापर कसा करायचा, याची माहिती दिली. मुलांना शस्त्रास्त्रांच्या वापरामुळे होणारे धोके आणि दुष्परीनामांची माहिती दिली.मुलांना कायद्याचे पालन करणे आणि शस्त्रास्त्रांचा गैरवापर टाळणे किती महत्वाचे आहे, हे समजावण्यात आले. खाकी वर्दीतला पोलीस पाहून मुलांच्या मनात भीती असते. मात्र ती भीती दूर ठेऊन विध्यार्थीनींनी सुद्धा मनमोकळेपणाने पोलीस दादांकडून शस्त्रांची माहिती करून घेतली. यामुळे नक्कीच हे चांगले पाऊल असून यामुळे मुलांच्या मनात शस्त्रास्त्रांबद्दल योग्य ज्ञान मिळून मनातील गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत होईल.
“हर घर तिरंगा” बाबत मार्गदर्शन
हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत, पोलिसांकडून शालेय विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे महत्त्व आणि देशभक्तीची भावना जागृत करून देताना विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज कसा फडकवायचा, त्याचे नियम काय आहेत, आणि तिरंग्याबद्दल आदर कसा ठेवायचा, याबद्दल मार्गदर्शन केले. या जनजागृती कार्यक्रमांमध्ये, पोलिसांनी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे महत्त्व समजावून सांगताना तिरंगा ध्वज हा आपल्या देशाची शान आहे आणि त्याचा आदर करणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.

