(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील घाटमाथ्याला जोडणाऱ्या रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाच्या कोंडगाव तिठ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे हा पुतळा हलविण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. पुतळ्याचे स्थलांतर कुठे करावे याबाबत आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या अध्यक्षतेखाली १० ऑगस्ट रोजी कोंडगाव ग्रामपंचायत कार्यालयात परिसरातील शिवप्रेमींची सभा घेण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा संकेत हॉटेलचे मालक संजय गांधी यांच्या खाजगी जागेत होता. सभेत पुतळ्याच्या नवीन ठिकाणाबाबत मतांतरे झाली. काहींनी तो नवीन स्टॅण्ड येथे बसवावा, तर काहींनी इतर ठिकाणी हलवावा अशी मते मांडली. चर्चेदरम्यान आमदार सामंत यांनी संजय गांधी यांना त्यांच्या जागेतच पुतळा पुनर्स्थापित करण्याची विनंती केली.
आमदारांच्या शब्दाचा मान राखत संजय गांधी यांनी चार फूट जागा देण्यास सहमती दर्शवली. मात्र पुतळ्याची पूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी, कारण राज्यात कुठेही गोंधळ किंवा विटंबना झाल्यास शासकीय पत्रव्यवहार थेट माझ्याकडे येतो, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर आमदार सामंत यांनी शासकीय यंत्रणेसमोरच त्यांची मागणी मान्य करून जबाबदारी शासनाकडेच राहील, असा शब्द दिला.
या मध्यस्थीमुळे पुतळा स्थलांतराचा प्रश्न सुटल्याने परिसरातील नागरिक व शिवप्रेमींनी आमदार सामंत आणि संजय गांधी यांचे आभार मानले. आमदार सामंत यांनी संजय गांधी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
या सभेला पंचायत समिती, महसूल विभाग, भूमिअभिलेख विभाग, पोलीस विभाग तसेच नागपूर–रत्नागिरी महामार्गाचे काम करणाऱ्या रविन इन्फ्रा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. सर्वपक्षीय पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते. यामध्ये कोंडगाव सरपंच श्रद्धा शेटये, विलास चाळके, बापू शेटये, राजेश पत्त्याणी, संजय सुर्वे, बापू शिंदे, जया माने, विलास बेर्डे, राजेश कामेरकर, बापू लोटणकर, प्रसाद अपंडकर, ओंकार कोलते, अमित केतकर, किरण सप्रे, शिरूशेठ कबनूरकर आदींचा समावेश होता.