(रत्नागिरी / वैभव पवार)
“मनाचे श्लोक” या पवित्र ग्रंथाच्या नावाचा मराठी चित्रपटासाठी वापर करण्यास हिंदुत्ववादी संघटना व समर्थ भक्तांचा ठाम विरोध केला आहे. १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणारा या चित्रपटाचा शीर्षकाचे मनाचे श्लोक हे नाव तात्काळ बदलावे, अन्यथा हिंदू संतांचा अवमान कदापी सहन करणार नाही, प्रसंगी रस्त्यावर उतरून विरोध केला जाईल. यासाठी आज रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी स्वीकारले.
मनाचे श्लोक हा राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेला २०५ दैवी श्लोकांचा एक पवित्र धर्म मार्गदर्शक आणि आध्यात्मिक ग्रंथ आहे. या ग्रंथाला मनोपनिषद असेही संबोधले जाते आणि तो मानवाच्या शारीरिक मानसिक व आत्मिक विकासासाठी जगभरात पूजनीय आहे. सुमारे साडेतीनशे वर्षांपासून या ग्रंथाचे पठण, अभ्यास आणि प्रचार अत्यंत श्रद्धेने केला जातो. हा ग्रंथ भारतीय समाजाच्या नैतिक आणि अध्यात्मिक जीवनाचा आधारस्तंभ असून कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे.
रामायण सारख्या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर कोणताही व्यक्ती किंवा संस्था व्यावसायिक फायद्यासाठी मक्तेदारी म्हणून करू शकत नाही. या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्याच्या तत्त्वानुसार मनाचे श्लोक या पवित्र ग्रंथाचे नाव चित्रपटासारख्या व्यावसायिक मनोरंजनाच्या माध्यमातून वापरणे हे कायद्याचे आणि नैतिकतेचे उल्लंघन आहे. यामुळे कोट्यवधी समर्थ भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजातील संताप व्यक्त होत आहे. हा चित्रपट धार्मिक भावना दुखावून सामाजिक तेढ आणि धार्मिक तणाव निर्माण करू शकतो. मनोरंजनासाठी कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा आणि धर्म परंपरेचा उपहास करणे कदापिही स्वीकारार्ह नाही.
जर या चित्रपटाचे शीर्षक बदलले नाही तर संत परंपरेच्या सन्मानाच्या रक्षणार्थ आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल.असेही या निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदन राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री ना.श्री आशिष शेलार, गृहराज्यमंत्री ना.योगेश कदम आणि अध्यक्ष केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ आदींना देण्यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
निवेदन देताना समर्थ भक्त आणि श्री देव गणपतीपुळे संस्थानचे मुख्य पुजारी श्री. अभिजीत विनायक घनवटकर आणि डॉक्टर चैतन्य वासंती वामन घनवटकर तसेच हिंदू जनजागृती समितीचे संजय जोशी, पांडुरंग पारले, शशिकांत जाधव,शैलेश बेर्डे, नितीन चेचरे, विष्णू बगाडे आदी उपस्थित होते.

