(संगमेश्वर / एजाज पटेल)
तिवरे-घेरा (प्रचितगड) येथील सामाजिक कार्यकर्ता राहुल रविंद्र गुरव यांनी मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कांटे–आरवली (सुमारे ४० किमी) चौपदरीकरण कामात ठेकेदार व संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांच्या सुलतानशाही कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी ११ ऑगस्ट रोजी सोनवी पुलावर आमरण उपोषणाचा निर्धार केला आहे.
यापूर्वी आरवली–संगमेश्वर–बावनदी मार्गावर होणारे वारंवार अपघात, दर्जाहीन व तकलादू रस्ताकाम, नव्याने टाकलेल्या कॉंक्रीट रस्त्याला अल्पावधीत पडलेल्या भेगा, पावसाळ्यात दरडी कोसळणे, जलनिकासीची दयनीय अवस्था या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.
संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मध्यस्थीने महामार्ग प्राधिकरण आणि आंदोलनकर्त्यांची बैठक झाली होती. त्यावेळी “काही दिवसांत प्रश्न सोडवू” अशी मौखिक हमी दिली गेली, मात्र ती पूर्ण न करता प्रशासनाने आणि ठेकेदारांनीच उपोषणास प्रवृत्त केले, असा आरोप गुरव यांनी केला आहे.
माध्यमांनी अनेकदा महामार्गावरील समस्यांचे छायाचित्रे व चित्रफीत प्रसारित करून ठेकेदार व प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला; तरीही सुलतानशाही कारभार सुरूच आहे. त्यामुळे जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या परिस्थितीविरोधात गुरव आक्रमक भूमिकेत उतरले असून त्यांना विविध संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक जनतेचा पाठिंबा मिळत आहे.
कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव हा अस्मितेचा सण असतो. पण गेली कित्येक वर्षे महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असून प्रवाशांना जीवघेण्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विकासाच्या नावाखाली कोकणी माणसाची दिशाभूल होत असल्याने गुरव यांनी कायदा-सुव्यवस्था बिघडू न देता जनहितासाठी उपोषणाचा मार्ग निवडला आहे.
संगमेश्वरवासीय आणि कोकणातील जनतेने या उपोषणाला साथ दिल्यास ठेकेदार व प्रशासनाचा बेलगाम कारभार थोपवता येईल; अन्यथा विकासाच्या नावाखाली सुरू असलेली दिशाभूल आपणच माथी मारून घ्यावी लागेल, असा इशारा गुरव यांनी दिला आहे.