(रत्नागिरी /प्रतिनिधी)
ग्रामपंचायत तळवडे येथे टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत ६ ऑगस्ट रोजी आयोजित एक्स-रे तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामपंचायत तळवडे, आयुष्यमान आरोग्य मंदिर तळवडे आणि क्षयरोग पथक राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिरात एकूण १८५ नागरिकांची एक्स-रे आणि CYTB चाचणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सौ. गायत्री साळवी, उपसरपंच शांताराम साळवी आणि सदस्या सौ. प्रेरणा गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी पीपीएम कोऑर्डिनेटर श्रीकांत सावंत, जिल्हा सुपरवायझर मंगेश पाटील, एक्स-रे तंत्रज्ञ श्रीहांगे, एसटीएस राहुल कोकणे, एसटीएलएस श्रीमती आचल मळेकर, राजापूर क्षयरोग पथक, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र करत कारवली तिठा येथील आरोग्य सहाय्यक व सेवकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक आणि आशा कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हे शिबिर यशस्वी ठरले. स्थानिक नागरिकांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत टीबी निर्मूलनाच्या लढ्यात भरीव योगदान दिले.
डॉ. गावडे यांनी सांगितले की, ग्रामपातळीवर अशा उपक्रमांमुळे टीबी नियंत्रण आणि प्रतिबंधाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय टीबी मुक्त भारताचे स्वप्न साकार होऊ शकत नाही.

