( विशेष /प्रतिनिधी )
गणेशोत्सवाच्या आगमनाला अवघे दोन आठवडे उरले असताना जिल्हाभरात भक्तांची तयारी जोरात सुरू झाली आहे. एस.टी., रेल्वे आणि खासगी वाहतूकदारांनी विशेष फेऱ्यांचे वेळापत्रक आखले असले तरी मुंबई–गोवा महामार्गापासून ते गावागावातील अंतर्गत रस्त्यांपर्यंत सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. यंदाही गणेशभक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार, हे चित्र स्पष्ट होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई–गोवा, मिऱ्या–नागपूर आणि गुहागर–विजापूर हे तीन राष्ट्रीय महामार्ग अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. आरवली–लांजा मार्गावरील काम थांबले असून संगमेश्वर परिसरातील रस्ता सर्वाधिक जीर्णावस्थेत आहे. मिऱ्या–नागपूर महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू असले तरी खोदकामामुळे पावसाळ्यात रस्त्यावर चिखल साचून वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. चौपदरीकरण पूर्ण न झालेल्या भागांत खड्डेच खड्डे असून पावसाचे पाणी साचल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण अद्याप अपूर्ण आहे. काही ठिकाणी जोडणी न झाल्याने चढ–उतार तयार झाले आहेत. शिवाजीनगर, आरोग्य मंदिर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रामआळी, परटवणे परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांची रेलचेल आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना दररोज खड्ड्यांतून वाहन चालवण्याची कसरत करावी लागत आहे.
ग्रामीण भागाचेही वाईट हाल, दुरुस्तीची तातडीची गरज
आरेवारे मार्गावरील श्री दत्त मंदिराजवळ भलामोठा खड्डा पडला आहे. याच मार्गावर गणपतीपुळेपर्यंत ठिकठिकाणी खड्डे आहेत. साखरतर पुलाचे काही काम पूर्ण झाले असले तरी बाकीचे खड्डे तस्सेच आहेत. आरेवारे–ढोकमळे मार्ग आणि नेवरे बाजारपेठ रस्ता हेही खड्ड्यांच्या विळख्यात आहेत. नेवरेच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण तर दोन वर्षांपासून रखडले असून ठेकेदाराने अर्धवट काम सोडले आहे. विघ्नहर्त्याच्या स्वागताला खड्ड्यांचे हे ‘विघ्न’ दूर करण्यासाठी तातडीने हालचाल होण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
http://youtube.com/post/Ugkxg5TaVhMbJwznDwxDSCZ2QTuq1aIUJA3A?si=szwtBxoeWDWZli6Y

