(रत्नागिरी)
घराच्या सुतारकामासाठी गेलेल्या ६० वर्षीय कामगाराचा पडून गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यात घडली. मयत दत्तात्रय शंकर पांचाळ (रा. तरवळ, मायंगडेवाडी, ता. रत्नागिरी) यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचा जीव वाचवता आला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय पांचाळ हे ८ जुलै २०२५ रोजी कुंबारवाडी येथील लक्ष्मण नारायण साळवी यांच्या घरात सुतारकाम करत होते. काम करत असताना अचानक ते पडले आणि त्यांच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना चिरायु हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर अधिक उपचारांसाठी त्यांना निर्मल बालरुग्णालयात हलवण्यात आले. अचानक पडल्यामुळे मेंदूला मार लागल्याने त्यांच्यावर तत्काळ ऑपरेशन करण्यात आले. काही काळासाठी त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आमृ. क्र. ५३/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. दत्तात्रय पांचाळ यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

