( रत्नागिरी )
चिपळूण येथे नुकत्याच पार पडलेल्या २५व्या जिल्हास्तरीय तायक्वॉंदो अजिंक्यपद स्पर्धेत लांजा तालुका तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकूण १८ पदकांची कमाई केली. स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० खेळाडूंनी विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके पटकावली. विशेषतः त्रिशा गणेश यादव हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक मिळवून ‘बेस्ट फायटर’ हा सन्मान मिळवला.
ही स्पर्धा रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या आयोजनात आणि शहानूर चिपळूण तालुका तायक्वॉंदो अकॅडमीच्या सहकार्याने चिपळूण येथील पुष्कर स्वामी मंगल कार्यालयात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा तायक्वॉंदो असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेशराव कररा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यांच्यासोबत उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांत घडशी, संचालक संजय सुर्वे हेही उपस्थित होते.
लांजा तालुक्यातील खेळाडूंनी विविध वयोगटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. सात वर्षांखालील स्पेशल गट मुलींमध्ये स्वर्णीम श्रेयस शेट्ये हिने सुवर्णपदक पटकावले, तर युगा प्रसाद डोर्ले व मायरा कुणाल जगताप यांना रौप्य, आणि अन्वी सचिन पवार हिला कांस्यपदक मिळाले. मुलांच्या गटात आराध्य महेश महाले याने सुवर्णपदक पटकावले. सब-ज्युनियर गटात त्रिशा गणेश यादव हिने सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’चा बहुमान मिळवला. कॅडेट गट मुलींमध्ये भक्ती भागवत कुंभार, परी संजय जड्यार व तेजस्वी दशतर लाड यांनी रौप्य, तर तीर्था गणेश यादव हिने कांस्य पदक मिळवले. कॅडेट गट मुलांमध्ये रुद्र संजय सुर्वे याने सुवर्ण, सय्यद साद साजिद सलीम व भाव्य हरेश पटेल यांनी रौप्य, आणि नैतिक रामेश्वर शेट्ये याने कांस्य पदक पटकावले. ज्युनियर गटात योगेश ईश्वर तोंडारे याने सुवर्ण, तर राकेश बाळू पवार आणि श्रेयस समीर सावंत यांनी कांस्य पदके मिळवली.
या खेळाडूंसह आराध्य कमलाकर सावंत, दत्तप्रसाद संजय बावदनकर, आर्या सचिन पवार, वृत्ती रंजन पावसकर, रोहन चंद्रकांत साबळे, आदी रंजन पावसकर, भाविन विनोद पटेल, आफताब झहीर कोंडकरी, अब्दुल्ला रईस सय्यद, अर्ष म्युझिब कालसेकर, प्रतीक मंगेश कोतवडेकर या खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. या सर्वांचा सहभाग लांजा तालुका तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमीसाठी अभिमानास्पद ठरला.
या यशस्वी कामगिरीमागे तालुक्याचे प्रमुख प्रशिक्षक तेजस पावसकर, शितल आचरेकर, गौरव खेडेकर आणि गणेश तोंडारे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत राष्ट्रीय पंच, प्रशिक्षक आणि राष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. सर्व पदक विजेते आणि सहभागी खेळाडूंचे अकॅडमीचे अध्यक्ष किशोर तुकाराम यादव, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सचिव तेजस्विनी आचरेकर, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे, मार्गदर्शक तेजस वडवलकर आणि समस्त पालकवर्ग यांनी विशेष अभिनंदन केले.