(चिपळूण)
जिल्हा परिषद शाळेच्या निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (वय ६३) यांचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह स्वतःच्या घरात आढळून आल्याने चिपळूण तालुक्यातील धामणवणे खोतवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निर्घृण खुनाचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलीस यंत्रणेकडून वेगाने तपास सुरू करण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृतदेह सापडल्यानंतर श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना तात्काळ पाचारण करण्यात आले. श्वानाने मृतदेहाजवळून थेट धामणवणे रस्त्याने डोंगरावरील एका फार्महाऊसपर्यंत धाव घेतली, यावरून मारेकरी जंगलाच्या दिशेने पळाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, या प्रकरणी एका जवळच्या व्यक्तीस चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हा खून नेमका कोणी आणि कोणत्या हेतूने केला, याचा तपास सध्या सुरू आहे.
मूळच्या गोंधळे येथील रहिवासी असलेल्या वर्षा जोशी या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. २०११ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले होते. त्या सुमारे ६ वर्षांपूर्वी निवृत्त झाल्या असून, तेव्हापासून धामणवणे खोतवाडी येथील घरी एकट्याच राहत होत्या.
विशेष म्हणजे, गुरुवारी त्या आपल्या मैत्रिणींंसह हैदराबादजवळील विठापूर येथे सहलीसाठी जाणार होत्या. त्यांनी त्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली होती. बुधवारी दिवसभर त्या मैत्रिणींशी संपर्कात होत्या. मात्र, बुधवारी रात्री नंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
त्यांची मैत्रीण तोरस्कर यांनी रात्री वारंवार फोन केला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने शंका वाढली. अखेर त्यांनी शेजारील शिरीष चौधरी यांना संपर्क करून चौकशी करण्यास सांगितले. चौधरी यांनी घरी जाऊन पाहिले असता दर्शनी दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर शेजारी व गावचे सरपंच यांनी मिळून मागचा दरवाजा पाहिला असता तो उघडा आढळला.
शेजारी घरात प्रवेश करताच संपूर्ण प्रकार उघडकीस आला. मृतदेहाची स्थिती पाहता, हातपाय बांधून खून झाल्याचे स्पष्ट होते. या अत्यंत धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस तपास अधिक गतीने सुरू असून, लवकरच हत्येचे कारण व मारेकरी उघडकीस येईल, अशी अपेक्षा आहे.