( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगावचे थोर सुपूत्र, सर्वमान्य नेतृत्व कै. नानासाहेब शेट्ये यांचे कला, कीडा, शेती व शिक्षण या क्षेत्रात केलेले निःस्वार्थी काम आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन राजापूर- लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले.
साखरपा येथे आयोजित कै. नानासाहेब शेट्ये यांच्या ३२ व्या स्मृतीदिनी विद्यार्थी गुणगौरव व पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, नानासाहेब शेट्ये हे राजकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी, त्यांची नाळ समाजातील गरीब लोकांशी जोडली होती. निःस्वार्थी समाजसेवा हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यांनी केलेले काम आजही सर्वसामान्यांच्या हृदयात आहे. त्यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली पोकळी आजही कोणी भरून काढू शकलेलं नाही हेच नानांचे श्रेष्ठत्व आहे, असे नमूद करून त्यांनी गुणवंत विद्यार्थी व पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्था यांचे मनापासून अभिनंदन केले.
कै. नानासाहेब शेट्ये यांचा ३२ व्या स्मृतिदिनाची सुरुवात कै. नानासाहेब शेट्ये आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार घाढून झाली. यानंतर पंचक्रोशीतील सातवीतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी इ. पाचवी आणि आठवीतील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, इयत्ता दहावी मध्ये सर्व शाळातून प्रथम आलेले विद्यार्थी, कला आणि वाणिज्य शाखेत प्रथम आलेले महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा प्रमुख आतिथीच्या हस्ते गुलाबपुष्प आणि रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
यानंतर कै. नानासाहेब शेट्ये स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले . कै. नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती पुरस्कार सन २०२५ वांझाळे गावचे निसर्ग व पर्यावरण रक्षक व ‘ नारळ मित्र ‘ म्हणून परिचित असलेले चेतन नाईक यांना प्रमूख पाहुणे सुभाष लाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर संस्था पुरस्कार सन २०२५ घाटीवळे पश्चिम विभाग मराठा संघ मुंबई या संस्थेला त्यांच्या ३० वर्षातील समाजाभिमुख उपक्रमांची नोंद घेऊन कै.नानासाहेब शेट्ये स्मारक समितीचे अध्यक्ष संदेश ऊर्फ बापू शेट्ये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह मानपत्र व रोख रु. २५००/- प्रत्येकी असे होते. या प्रसंगी पुरस्कारप्राप्त व्यक्ती चेतन नाईक व संस्था प्रतिनिधी म्हणून संतोष भुजबळराव यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य विजय बाईंग यांनी कै. नानांच्या अनेक आठवणी सांगितल्या. उपस्थित मान्यवरांपैकी अशोक जाधव यांनी कै. नानांच्या समाजकार्याचा आढावा घेतला. अध्यक्षपदावरून बोलतांना दत्ताराम शिंदे यांनी कै. नाना हे पंचक्रोशीतील गरीबांचे आधारस्तंभ होते असे नमूद केले. संदेश उर्फ बापू शेट्ये यांनी संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणपत शिर्के यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रमाकांत शिंदे, मारुती शिंदे, रमाकांत शेट्ये, विरेंद्र शेट्ये, प्रसाद कोलले यांनी मेहनत घेतली.
फोटो : कै. नानासाहेब शेट्ये व्यक्ति पुरस्कार सुभाष लाड यांच्या हस्ते स्वीकारताना नारळ मित्र चेतन नाईक, संस्था पुरस्कार संदेश शेट्ये यांच्या हस्ते स्वीकारताना घाटीमुळे पश्चिम विभाग मराठा संघ मुंबईचे संतोष भुजबळराव