( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
भर समुद्रात एलईडी लाईटने मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकेवर सीमाशुल्क विभागाने कारवाई करून नोकेवरील साहित्य जप्त करून चारजण ताब्यात घेतले आहे.
खोल समुद्रात पर्ससीन नौकांना एलईडी लाईट दाखवून मासेमारीसाठी सहाय्य करणाऱ्या नौकेला सीमाशुल्क विभागाच्या गस्ती पथकाने मिरकरवाडापासून १० वाव समुद्रात ताब्यात घेतली. या नौकेवरील साहित्य जप्त करण्यात आले असून, तांडेलसह तीन खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही नौका मत्स्य विभागाच्या ताब्यात दिली जाणार आहे.
खोल समुद्रात १० ते २५ वाव दरम्यान पर्ससीन नौका मासेमारी करतात. खोल समुद्रात मोठ्या प्रमाणात मासे मिळावेत यासाठी आता पर्ससीन नौकांकडून एलईडीचा वापर सुरू झाल्याचे या कारवाईमुळे उघड झाले आहे. सापडलेल्या नौकेच्या चारी बाजूने १००० ते ८०० व्हॅटचे मोठे एलईडी बल्ब लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे पाण्यात सोडता येणारे बल्बही आढळले आहेत. हे बल्ब खोल पाण्यात सोडून माशांना आकर्षित केले जाते आणि त्यानंतर पर्ससीन नौका या माशांना पकडतात. या नौकेवर जवळपास सहाशेहून अधिक लिटर डिझेल. मोठा जनरेटर सापडला आहे.
सीमा शुल्क विभागाने नौकेवरील चौघांना ताब्यात घेतले असून, यामध्ये एक तांडेल व तीन खलाशी आहेत. यातील तीनही खलाशी हे नेपाळी असून, तांडेल कर्नाटकातील असल्याची माहितीही सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सीमा शुल्क विभागाचे सहायक आयुक्त संदीप कृष्णा, अधीक्षक पवन राठी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे निरीक्षक राजेश लाडे, निरीक्षक रमेश गुप्ता व आठ कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. नौका व साहित्य मत्स्य विभागाच्या ताब्यात दिले जाणार आहे.