(रत्नागिरी)
भारतीय घटनेनुसार प्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकारी आहे. त्याला आत्मनिर्भर करण्यासाठी व मदतीचा हात देण्यासाठीच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने कायदेविषयक जनजागृती करण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे सचीव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले.
सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल मध्ये विद्यार्थी, शिक्षक यांचेसाठी आयोजित बाल-अनुकुल कायदेशीर सेवा योजना २०२४, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोक्सो कायदा, समाजातील महिलांची सुरक्षा आणि गोपनीयता व जन-जागृती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. श्री पाटील पुढे म्हणाले, समाजात कायदे विषयक जागृती निर्माण करण्याचा मुख्य उद्देश आहे. शिवाय समाजातील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न ही केला जात आहे. विशेषतः बालक, स्त्रिया व वृद्ध हे अन्यायाला अधिक बळी पडत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी सरकाराने कडक कायदे केले आहेत.
यावेळी ॲड. अमित शिरगावकर यांनीही पोक्सो संदर्भात सविस्तर माहिती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास कोळेकर यांनी श्री पाटील व श्री शिरगावकर यांचे शाल, श्रीफळ व बुके देवून सत्कार केला. तसेच मुख्याध्यापक श्री कोळेकर यांना नुकताच राष्ट्रीय स्तरावरील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेचे
युवाशक्ती प्रमुख व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे कायदा साथी अरुण मोर्ये यांनी सन्मानचिन्ह देवून सत्कार केला.श्री माधव अंकलगे सर यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.यावेळी श्री. कारंडे
लिपिक, तसेच इरा इंग्लिश मिडीयम स्कुल, दि मॉडेल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री बळकटे व विनोद पेढे यांनी केले.