(संगमेश्वर /प्रतिनिधी)
देवरूखमधील कोसुंब ते ताम्हाणे या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली असून, सार्वजनिक बांधकाम उप विभाग देवरूख यांच्या अकार्यक्षमतेमुळे स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप करत, संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या मार्गदर्शनाखाली सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र, त्यावेळेसच कामाच्या दर्जाबाबत तक्रारी उपस्थित करण्यात आल्या होत्या. माजी उपअभियंत्यांनी सदर तक्रारीकडे दुर्लक्ष करत काम पूर्ण करून घेतले. याचा परिणाम आज रस्त्याच्या अक्षरशः चाळण झालेल्या अवस्थेतून दिसून येतो आहे.
दररोज शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक व कामावर जाणारे नागरिक यांना या खडखडीत रस्त्यामुळे प्रचंड त्रास होत असून, वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामासाठी कुठलाही माहितीचा फलक लावण्यात आलेला नाही. हे संपूर्ण काम गुप्तपणे आणि पारदर्शकतेशिवाय पूर्ण करण्यात आले असल्याचा आरोप माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी केला आहे.
गुरव यांनी सांगितले की, सदर रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना औपचारिक लेखी अर्ज सादर करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्यक्ष कार्यालयात जाऊनही याची सविस्तर माहिती दिली जाईल. दोषी अभियंता व ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, अशी आमची ठाम मागणी आहे.
सार्वजनिक निधी खर्चून उभारण्यात आलेल्या रस्त्याचे काम दीर्घकाळ टिकावे हीच अपेक्षा असते. मात्र, याठिकाणी कामाच्या गुणवत्तेचा अभाव दिसून येतो. यामुळे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा प्रकारे जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत कामे मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. एकूणच, कोसुंब-ताम्हाणे रस्त्याचे हे प्रकरण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर व पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत.