(रत्नागिरी)
निवळी–जयगड मार्गावर अवजड वाहनांची अव्याहत वाहतूक सुरू असून, या वाहनांमधून प्रमाणापेक्षा जास्त ओव्हरलोड मालवाहतूक केली जाते. त्यामुळे ही वाहने वारंवार वळणावरच बंद पडतात आणि परिणामी वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होतो. याकडे आरटीओ विभागाचे अधिकारी कायम दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक वाहनचालकांकडून होत आहे.
या मार्गावर नियमित वाहतूक करणारे दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनचालक या समस्येमुळे सतत त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवजड वाहतुकीमुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. विशेष म्हणजे, आता बल्करसोबतच गॅस वाहतुकीचीही भर पडली आहे, तीही नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप होत आहे.
छोट्या वाहनचालकांना अवजड वाहनांच्या वेगामुळे कायम भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन, जयगड–निवळी मार्गावर अवजड वाहनांवर काटेकोर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी स्थानिकांनी आरटीओ विभागाकडे केली आहे.