(रत्नागिरी)
शहरातील प्रमुख रस्त्यांवर गेले काही दिवस खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उघडकीस आलेल्या या समस्येमुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल सुरू होते. दररोजच्या दणक्यांनी वैतागलेल्या नागरिकांनी सोशल मीडियावरून तसेच स्थानिक प्रशासनाकडे वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती.
शेवटी, नगरपालिकेने या तक्रारींची दखल घेत शहरातील खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह काही अंतर्गत मार्गांवरही सध्या खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता का होईना, पण दिलासा मिळताना दिसतो आहे. मात्र ही डागडुजी तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना कायम आहे. कारण अशा पद्धतीने भरलेले खड्डे काही दिवसांतच पुन्हा उघडकीस येतात आणि त्याच ठिकाणी पुन्हा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
शहरातील विविध भागांतून आता मागणी होत आहे की, ही डागडुजी केवळ औपचारिकता न राहता, रस्त्यांवरील केली जात असलेली मलमपट्टी दीर्घकाळ टिकेल अशा स्वरूपात करावी. थोडक्यात दर्जेदार काम करावे, विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची टिकावू कामे झाली, तरच शहरातील रहदारी सुरळीत होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. नगरपालिकेकडून या कामांच्या दर्जावर लक्ष ठेवले जात आहे का, यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.