(दापोली)
परभणीचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबाबत जाहीर कार्यक्रमात केलेल्या अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध करत दापोली तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून शांततेत आंदोलन केले.
दिनांक २ ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात पार पडलेल्या प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी पत्र वाटप कार्यक्रमात मंत्री बोर्डीकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबाबत सार्वजनिक मंचावर अवमानकारक, असभ्य आणि धमकीचे स्वरूप असलेले वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायत यंत्रणेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अधिकाऱ्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम झाल्याची भावना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन १३६ मार्फत व्यक्त करण्यात आली.
या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकारी काळी फित लावून आपल्या नियमित कामकाजावर उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे, दापोली तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्याकडे निषेधाचे निवेदन सादर केले.
युनियनमार्फत मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना याबाबत अधिकृत निवेदनही पाठवण्यात आले आहे. भविष्यात अशा प्रकारचे वक्तव्य थांबवावे, तसेच अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचणाऱ्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.