(दापोली)
दापोली तालुक्यातील दळणे एमआयडीसी परिसरात असलेल्या कोकण फळ प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित या काजू कारखान्यात आज सकाळी भीषण अपघात घडला. चेन पुली लिफ्ट कोसळून महिला कामगार प्रविणी प्रभाकर कासेकर (वय ५५, रा. ओळगाव, विजयशंकरवाडी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर कारखाना व्यवस्थापक आणि लिफ्ट ऑपरेटरवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविणी कासेकर या गेल्या पाच वर्षांपासून संबंधित कारखान्यात कार्यरत होत्या. दररोजप्रमाणे आजही त्या सकाळी आठ वाजता ड्युटीवर हजर झाल्या. सकाळी सुमारे ११.३५ च्या सुमारास त्या लिफ्टखाली काजूच्या बिया साफ करत असताना अचानक लिफ्टचा बार तुटून लिफ्ट त्यांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत त्यांना डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर इजा झाली. तत्काळ मदत मिळाली असली, तरी उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत प्रविणी यांच्या पतीने प्रभाकर यशवंत कासेकर (वय ५९) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, कारखान्याचे व्यवस्थापक धनंजय लक्ष्मणराव यादव (रा. वळणे एमआयडीसी) यांनी कामगार सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या नव्हत्या. लिफ्टची कोणतीही तांत्रिक तपासणी किंवा देखभाल करण्यात आलेली नव्हती. तसेच लिफ्ट ऑपरेटर प्रणय प्रकाश पवार (रा. दापोली) याने क्षमतेपेक्षा जास्त काजूच्या बियांची पोती लिफ्टमध्ये भरून ती चालू केल्याने लिफ्टचा बार तुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेनंतर दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम १०६(१), १२५(१), १२५(ए), ३(५) नुसार गुन्हा (गु.र.नं. ११५/२०२५) दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.