(पुणे)
भारतात प्रथमच पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने, तसेच एजीसी स्पोर्ट्स आणि पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – २०२५’ ही भव्य क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ११ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, म्हाळुंगे, पुणे येथे पार पडणार आहे.
यासंदर्भातील माहिती पद्मश्री आणि भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर, आयोजक आकाश कुंभार, तसेच आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे कार्यकारी अधिकारी मनोहर मुकुंद जगताप आणि संचालक अजय मुकुंद जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आयोजक संस्थेचे रफिक खान, कपिल मिसाळ, विष्णू धोत्रे, किरण लोहार आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी, पॅरा जलतरण, पॅरा ॲथलेटिक्स आणि व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे खेळाडूंची ‘अल ऐन – दुबई २०२५ पॅरा नेमबाजी विश्वचषक’ व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड होणार आहे.
या स्पर्धेत टोकियो व पॅरिस पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेकरा, कांस्यपदक विजेती मोनो अग्रवाल, रुबिना फ्रान्सिस, अशा १३ पॅरालिम्पियन खेळाडूंसह ५० आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आणि देशभरातून ६०० हून अधिक पॅरा क्रीडापटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी १५ आंतरराष्ट्रीय पंच, १५ राष्ट्रीय पंच, १५ अधिकारी आणि ५० स्वयंसेवक काम पाहणार आहेत.
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे, २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अल-इन, दुबई येथे होणाऱ्या पॅरा नेमबाजी विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. या दुबई दौऱ्याचा सर्व खर्च भारत सरकारतर्फे करण्यात येणार असल्यामुळे, या निवड प्रक्रियेमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. पॅरा जलतरण स्पर्धा एकूण १४ विभागांमध्ये, तर पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा ४९ विभागांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. एजीसी स्पोर्ट्सच्या पुढाकारामुळे दिव्यांग खेळाडूंना ‘खेलोत्सव – पॅरा एडिशन’च्या माध्यमातून एक नवीन राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले असून, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे दिव्यांग क्रीडापटूंना नवे संधीचक्र खुले होणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज ही संस्था रिअल इस्टेट, शिक्षण, सौर व हरित ऊर्जा, पर्यटन व हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक्स, इव्हेंट मॅनेजमेंट, मीडिया आणि मनोरंजन या विविध क्षेत्रांत कार्यरत असून, सामाजिक भान राखत ग्रामीण विकास व युवक सशक्तीकरण यासाठीही मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. एजीसी स्पोर्ट्स ही आर्यन्स ग्रुपची क्रीडा वाहिनी असून, विशेषतः ग्रामीण आणि दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे.