(नाशिक / प्रतिनिधी)
कलियुगाची जबाबदारी श्री स्वामी समर्थ महाराजांवर असून स्वामी सेवेचे महत्व घराघरात अन् मनामनात पोहोचविल्यास आपल्या हातून धर्म,समाज आणि राष्ट्र कल्याणाचे पवित्र कार्य घडेल असे मौलिक विचार अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी मांडले तेव्हा सेवेकर्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना प्रतिसाद दिला.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये शनिवारी (२ ऑगस्ट) महाराष्ट्रातून आलेल्या ८०० सेवेकर्यांनी राष्ट्रहितासाठी एकदिवसीय श्रीमद् गुरुचरित्र पारायणाची सेवा रुजू केली. यावेळी गुरुमाऊलींच्या हस्ते श्री संस्कार वहीचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर साप्ताहिक सत्संगात त्यांनी सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले.
१२ लक्ष श्री स्वामी समर्थ जपाची महती..
गुरुमाऊली श्री. मोरे म्हणाले की, आज आपण श्री संस्कार वहीचे लोकार्पण केले आहे. याच वहीमध्ये प्रत्येक सेवेकऱ्याने येणाऱ्या दत्त जयंतीपर्यंत बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप लिहायचा आहे. या जपातून प्रचंड ऊर्जा निर्माण होणार असून यातूनच राष्ट्रहिताबरोबरच आपलेही कल्याण होणार आहे. ही सेवा प्रत्येक सेवेकऱ्याने केल्यास अवघे राष्ट्र स्वामीमय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गाणगापूर ,पिठापूर आणि वाडीमध्ये आगामी सत्संग..
आपल्या ओघवत्या शैलीत सेवेकऱ्यांना संबोधित करताना गुरुमाऊलींनी आगामी ऑक्टोबर महिन्याचा मासिक सत्संग गाणगापूर येथे घेण्यात येणार असून गाणगापूर नंतर पिठापूर आणि नरसोबाची वाडी येथेही सत्संग घेण्यात येईल असे जाहीर केले. वार्षिक सत्संग वेगवेगळ्या दत्तक्षेत्री होणार असल्यामुळे सेवेकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
सेवामार्गाचे अठरा विभाग मानव उद्धारासाठी
सेवामार्गाचा मूल्य संस्कार, बालसंस्कार, शिशू संस्कार, गर्भसंस्कार, विवाह संस्कार, कृषी, प्रश्न- उत्तरे, वेद विज्ञान संशोधन, कायदेविषयक सल्लागार, पर्यावरण प्रकृती, स्वयंरोजगार, दुर्ग आदी अठरा विभाग मानव कल्याणासाठी आणि राष्ट्र सेवेसाठी कार्यरत आहेत. यापैकी सेवेकर्यांनी आवडेल त्या विभागात सेवाकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. या सर्व विभागांमध्ये मूल्यसंस्कार विभागाला सेवामार्गाने झुकते माप दिले असून गावागावात बालसंस्कार केंद्र उभारा अशी आज्ञा त्यांनी केली. यावेळी गुरुपुत्र श्री चंद्रकांतदादा मोरे, श्री नितीनभाऊ मोरे यांची उपस्थिती होती.