(रत्नागिरी / वार्ताहर)
आंब्याच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कोकणात आंबा कॅनिंग फॅक्टऱ्या मोठ्या आहेत, जे आंबा बागायतदार शेतकरी आहेत त्यांना रत्नसिंधु योजनेतून ९३ बोलेरो गाड्या देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पावस येथे झालेल्या “महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड” चे मानकरी संदीप यशवंत पावसकर यांच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी केले.
यावेळी रत्नसिंधु आंबा व्यापारी संघ, सिंधुदुर्ग-रत्नागिरी चे दिलीप सामंत, विविध उद्योजक, व्यावसायिक, आंबा व्यापारी, राजकीय नेते, विविध फॅक्टरींचे संचालक, मॅनेजर, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मयुर मॅगो सप्लायर्स अँड मँगो पल्प चे संचालक संदीप यशवंत पावसकर यांचा नाशिक येथे महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड २०२५ चे कार्यक्रमात सन्मान झाल्यानंतर त्यांचा कौतुक सोहळा पावस येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी उपस्थित राहून आंबा बागायतदार व उद्योजकांना मार्गदर्शन केले. संदीप पावसकर यांना त्यांच्या सौभाग्यवतींसह सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी दिलीप सामंत (रत्नसिंधु आंबा व्यापारी संघ), राजकुमार देसाई (दि स्वयंम शुगर हाऊस, कोल्हापूर), शिवसेनेचे महेश उर्फ बाबू म्हाप, पावस आंबा उत्पादक निर्यातदार आनंद देसाई, विजय देसाई, अश्रफ कप्तान, स्वप्नील गडेकर, राजू पांगम, बिपिन बंदरकर, संजू साळवी, अक्षय तोडणकर, सरपंच चेतना सामंत, प्रवीण शिंदे, विजय चव्हाण, हरीष सामंत, विजया पावसकर, निहार पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संदीप पावसकर यांनी म्हटले की, “यश मिळवण्यात आई-वडिलांचे आशीर्वाद महत्वाचे असतात. तसंच हा पुरस्कार आपण सर्वांनी मला दिलेल्या सहकार्याचा आहे. यात शेतकरी, आंबा बागायतदार, व विविध कंपन्यांचे संचालक यांचा मोठा वाटा आहे.” तर सुमेधा पावसकर म्हणाल्या, “संदीप यशस्वी होईल की नाही याची आम्हाला भीती होती; परंतु निसर्गाची साथ, कुटुंबाचा आधार आणि संदीपची जिद्द, आणि आपणा सर्वांचे आशीर्वाद या सर्वांना माझा सलाम आहे.”
ना. उदय सामंत म्हणाले, “संदीपने मोठ्या संघर्षातून हा पुरस्कार मिळविला आहे. आम्हीही मामाकडे कॅनिंग शिकलो, पहाटेपर्यंत जागून काम पाहिले. आता आंबा बागायतदारांनी एकत्र यायला हवे; बॅटरी आंबा बंद झाला पाहिजे, कारण त्यातून चोरीला प्रोत्साहन मिळते. तर खऱ्या अर्थाने आंबा बागायदाराची प्रगती होऊ शकते.”
त्यांनी पुढे सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स्पोर्ट माल व त्यावरील कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले असून आता आपला माल युरोपमध्येही पाठवू शकतो. रत्नसिंधु योजनेतून आधीच ८६ बोलेरो गाड्या देण्यात आल्या आहेत; अजून ९३ गाड्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. सातबारावर नोंद असणाऱ्यांना तपासून गाड्या दिल्या जातील.”
कोकणामध्ये फळ प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजेत, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, “कर्नाटकी आंबा कोल्हापूरमार्गे राज्यात येतो, त्यावर आवाज उठवला पाहिजे. रत्नागिरी व सिंधुदुर्गचा आंबा चव, रूप, गुणवत्तेमुळे जगात सरस आहे. पण हापूसला न्याय मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे,” असे उदय सामंत म्हणाले.
शेवटी, पावस आंबा बागायतदार व विविध संघटनांच्या वतीने ना. उदय सामंत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.