(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील रामआळी परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या विचित्र अपघातात हॉट चिप्स दुकानातील उकळत्या तेलाच्या कढईला उनाड गायीची धडक बसून दोघे तरुण भाजून जखमी झाले. ही घटना रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. सिद्धेश प्रकाश दळवी (वय २६, रा. कोळंबे, रत्नागिरी) आणि दीपक सुरेश कोलापटे (वय २६, रा. झारणी रोड, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.
सिद्धेश आणि दीपक हे दोघे गुरुवारी सायंकाळी रामआळी येथील एका हॉट चिप्स दुकानाबाहेर उभे होते. त्याच वेळी दुकानासमोरून जाणाऱ्या एका उनाड गायीने दुकानातील तेलाच्या कढईला जोरदार धडक दिली. या धडकेत कढईतील उकळते तेल बाहेर सांडले आणि त्याचा फटका सिद्धेश व दीपक यांना बसला. दोघेही या घटनेत भाजून जखमी झाले. घटनेनंतर तातडीने दोघांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची नोंद पोलिसांकडून घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

