(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या जयस्तंभ ते स्टेट बँक मार्गावरील एका संकुलातील दोन फ्लॅट बुधवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दिवसाढवळ्या, भरवस्तीत अशा प्रकारची घटना घडल्यामुळे पोलिस यंत्रणेची कार्यक्षमता आणि शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) माईनकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, डिटेक्शन ब्रँच (DB) स्कॉड व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास सुरू केला आहे. चोरीच्या प्रकाराची व्याप्ती व गुन्हेगारांनी वापरलेली पद्धत याबाबत सखोल तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. जयस्तंभ परिसर हा शहरातील अत्यंत गर्दीचा आणि वर्दळीचा भाग मानला जातो. अशा ठिकाणी भरदिवसा दोन फ्लॅट फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर पोलिसांसमोर आता चोरट्यांचा छडा लावणे हे मोठे आव्हान ठरू लागले आहे.