( संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबईचे अध्यक्ष, अपना परिवाराचे निमंत्रक तसेच अपना बँकेचे उपाध्यक्ष अशी पदे भुषविलेले, समाजवादी विचारसरणीचे अशोकभाई पंढरीनाथ सरफरे यांचे दीर्घ आजाराने सोमवारी सकाळी मुंबई येथे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे संस्था परिवारात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक पंढरीनाथ तथा दादासाहेब सरफरे यांचे कार्य अशोकभाईंनी अगदी तरुण वयापासुन स्विकारले होते. बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या उभारणीमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. समाजवादी विचारांचा प्रभाव त्यांच्या कार्यातुन, चळवळीतुन नेहमीच प्रत्ययास येत होता.
अशोकभाई म्हणजे कायम हसतमुख असणारे, मोजकेच पण मार्मिक बोलणे तसेच कायम खादीचा सफेद झब्बा, लेहंगा असा पेहराव, उंच भारदस्त असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. अशोकभाई यांच्या वडिलांनी अनेक संस्था निर्माण केल्या आणि त्या संस्था पुढे अशोकभाईंनी चालवल्या आणि वाढविल्या देखील. या संस्थांमध्ये काम करताना कधीही अशोकभाईंनी कोणताही बडेजाव किंवा मीपणा आणला नाही. अपना बँक, अपना बाजार, आपना परिवार तसेच बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केले. या शिक्षण संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष होते. सर्वसामान्यातील एक कार्यकर्ता म्हणूनच ते सदैव कार्यरत होते. त्यांनी अनेक तरुण कार्यकर्त्यांचे काम पाहून या शिक्षण संस्थेच्या प्रवाहात आणले.
अशोकभाई हे गेली अनेक वर्ष अल्झायमर या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु होते. गेले सहा महिने त्यांची तब्ब्येत खूपच खालावत चालली होती. आणि सोमवारी १० रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. अशोक सरफरे हे कोसुंब गावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वडाळा विधानसभा अध्यक्षपदी कार्यरत असलेला प्रसाद हा त्यांचा मुलगा आहे.