(गणपतीपुळे / वैभव पवार)
कोकणातील निसर्गरम्य ठिकाण आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे मंदिरात भाविकांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड ची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
गणपतीपुळे मंदिराच्या मुख्य महाद्वाराजवळ गणपतीपुळे देवस्थान समितीकडून वेशभूषा संदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणाली संदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करूनच मंदिरात दर्शनासाठी जावे लागणार आहे. याबाबत मंदिर समितीने भाविकांना व वेशभूषा संबंधी नियम पाळण्याचे आवाहन केले असून कमी कपड्यातील ट्रीप मूड अथवा समुद्रावर जाण्यासाठी करण्यात येणारा पेहराव टाळण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. तसेच महिला किंवा मुलींसाठी गुडघ्यांच्या वर येणारे स्कर्टस किंवा शॉर्ट ड्रेसेस परिधान करू नयेत तसेच असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे टाळावे असे हे सांगण्यात आलं आहे.

आक्षेपार्ह भाषा किंवा चित्र असलेल्या तोकड्या अशा कपड्यातील मंडळींना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश निषिद्ध असेल, त्याकरिता आम्हाला भीड घालू नये. केवळ दहा वर्षाच्या आतील मुलांना या नियमातून सूट असेल, असेही देवस्थान समितीने म्हटले आहे.
गणपतीपुळे मंदिरात आम्ही भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. या ड्रेसकोड संदर्भात आलेल्या भाविकांनी नियमावली लक्षात घेऊन योग्य ते सहकार्य करावे. तसेच खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीला साजेसा पोशाख करून मंदिरात दर्शन घ्यावे असे आमचे म्हणणे आहे.
– सरपंच डॉ. श्रीराम विश्वनाथ केळकर,
संस्थान श्री देव गणपतीपुळे.

