(चाफे / हरेश गावडे)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्था मालगुंड संचलित मोहिनी मुरारी मयेकर कला वाणिज्य महाविद्यालय, चाफे येथे महाविद्यालयाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरीच्या संपूर्ण वैद्यकीय टीमने सहकार्य केले. रक्तदानाचा मुख्य हेतू म्हणजे गरजू व्यक्तींना जीवनदान मिळावे हा असून, समाजातील अशा अनेक रुग्णांना मदत करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, परिसरातील रक्तदाते तसेच माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत एकूण १६ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी दर्शवली.
सदर उपक्रम मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व युवा नेते श्री. रोहित मयेकर, संस्थेचे संचालक श्री. सुरेंद्र माचिवले आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
रक्तदात्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, महाविद्यालयाने सामाजिक भान जपत वर्धापन दिन अधिक अर्थपूर्ण केल्याचे मान्यवरांनी सांगितले.