(रत्नागिरी / प्रतिनिधी)
किनारपट्टी सुरक्षेला बळकटी देत रत्नागिरी जिल्ह्यात १९ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ ते २० नोव्हेंबर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत “सागर कवच अभियान–02/25” ही व्यापक संयुक्त सुरक्षा सरावमोहीम राबविण्यात आली. जिल्हा पोलीस दल, तटरक्षक दल, नौदल, कस्टम, बंदर विभाग, मत्स्य विभाग, समुदाय प्रतिनिधी तसेच विविध स्थानिक यंत्रणांचा या सरावात सहभाग होता. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती, सागरी गस्त, किनारपट्टी तपासणी आणि समन्वय यंत्रणांची कार्यक्षमता तपासण्याचे या सरावाचे उद्दिष्ट होते.
सरावादरम्यान तालुका पातळीवरील विविध संवेदनशील किनारी भागांमध्ये सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला. संभाव्य घातपात, तस्करी, घुसखोरी आणि अन्य समुद्रमार्गे होणाऱ्या बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने प्रतिसाद देत प्रभावी कृती दाखवली. यावेळी मॉक ड्रिलच्या स्वरूपात विविध घटनांचा प्रयोग करून पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणांची सज्जता तपासण्यात आली.
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १.२५ वाजता दूध पास वाहन (रेफोर्स) च्या माध्यमातून संशयित कृत्याचा सिम्युलेशन प्रयोग करण्यात आला. त्यानुसार ‘नटराज’ या IND–MH–06–199 क्रमांकाच्या वाहनाला पोलीस पथकांनी तत्काळ अडवून त्याची कसून झडती घेतली. वाहनातील संशयित सामग्रीच्या आधारे विविध सुरक्षा निकषांची पूर्तता तपासण्यात आली. संपूर्ण कारवाईत जिल्हा पोलीस यंत्रणेने दक्षता, वेगवान प्रतिसाद आणि उच्च दर्जाची समन्वयक्षमता प्रदर्शित केली.
या अभियानात पोलीस अधिकारी ४८, पोलीस अंमलदार ४६४, होमगार्ड १००, सुरक्षा वॉर्डन ४७, सागर रक्षक स्वयंसेवक ४१, पोलीस पथके ६८, एन.सी.सी. कॅडेट ४४, एन.एस.एस. विद्यार्थी ४० आणि अधिकृत ड्रोनसह २ तांत्रिक युनिट्स अशी एकूण मोठी मानवी फौज सहभागी होती. अभियानादरम्यान विविध ४,७८७ वाहनांची तपासणी करण्यात आली, तर ९,७८९ नागरिकांची ओळख पडताळणी पार पाडण्यात आली. समुद्र किनारपट्टीवरील ८० बोटींना रोखून तपासण्यात आले असून, त्यापैकी ९६० व्यक्तींची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे अभियान यशस्वीपणे पूर्ण झाले असून किनारपट्टी सुरक्षाव्यवस्थेला अधिक विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित सर्व विभाग आणि स्वयंसेवकांचे कौतुक करत पुढील काळातही अशा सरावमोहीमा नियमितपणे राबवण्याचे संकेत दिले आहेत.

